➖➖ सांग विधात्या ➖➖
दिवास्वप्न होतं हे की, रात काळी काळी?
सांग विधात्या लिहिलं, काय माझ्या भाळी !! धृ !!
नाव तुझं गोंदताना, झाला जरी त्रास
तूच होता तूच आहे, सखा माझा खास
आटू नये कशानेही, राहो अशी माया
विनविते पांडुरंगा, अन कृष्णराया
होळी झाली बेरंग नि, अंधारी दिवाळी !! १ !!
येता जाता होतो मज, पावलांचा भास
वाटे मग आहेस तू, इथे आसपास
विरहात राजा तुझ्या, होते लाही लाही
हाल माझे पुसावे तू, दश दिशांनाही
झाला परका तू होता, माझा कधीकाळी !! २ !!
पानं पिवळी पिवळी, सुकलेल्या वेली
सुंदरता वसंताची, कोणी कुठे नेली
याच माझ्या हातांनी जी, फुलविली बाग
आळविते अताशा ती, विरहाचा राग
हिवाळ्यात लागे मज, उन्हाची झळाळी !! ३ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !